# रेशीम नाती ...

- **Written by:** Dr. Manasi Arkadi
- **Published:** 21 January 2013
- **Language:** Marathi (Devanagari)

(22)

कोण म्हणतं की ओढ फक्त समुद्राच्या पाण्यालाच असते, खरंतर ती त्या शब्दालाच आहे! ती अथांग निळाई, त्या फेसाळलेल्या लाटा, ती मऊ मऊ वाळू, तो खारा वारा सगळच नादावून टाकणारं आहे. ती गाज दुरून जरी कानी पडली तरी पावलांच्या आधी मन तिथे जाऊन पोहोचतं आणि मग काय काय लपलं असेल त्याच्या पोटात या विचाराने त्याच्याबद्दलचं कुतूहल अजूनच वाढत जातं. किती छोट्या मोठ्या नद्या, नाले, झरे विलीन होत असतील नाही का या समुद्रात! नदीच्या आत्मसमर्पणापुढे आपण सारेच नतमस्तक होतो, पण समुद्राला देखील आपल्या विस्तारात तिच्या योगदानाची जाणीव असेलच की! खूप भरून येत असेल त्याला तिच्या या 'स्व'त्व बाजूला सारून दिलेल्या आहुतीने. चंद्र, गुरुत्वाकर्षण अशी शास्त्रीय कारणं आहेतच, पण समुद्राला येणाऱ्या भरतीचं भावनिक कारण कदाचित हे असेल!

पंचवीस वर्षानंतर निषादचं रुपांतर सुद्धा एका भव्य समुद्रात झालं आहे. आताचं 'पॉलिश्ड' रूप जरी आपल्याला दिसत असलं, तरी त्याच्या जडणघडणीत ज्यांनी ज्यांनी 'कच्च्या मालाचं' काम केलं आहे त्या सगळ्यांचा शेखर ऋणी आहे, त्या सगळ्या आठवणी त्याने जीवापलीकडे जपून ठेवल्या आहेत.

'मेलडी मेकर्स' या अत्यंत गाजलेल्या वाद्यवृंदाचे संस्थापक सुरेंद्र अकोलकर हे त्यापैकीच एक! स्वतः एक उत्तम गीतकार, संगीतकार, की-बोर्ड वादक असलेल्या अकोलकर सरांनी शेखरच्या आवाजाची पारख केली होती. हा 'लंबी रेस का घोडा' आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी शेखरला संधी तर दिलीच, पण संगीतकार या नात्याने केलेल्या त्यांच्या प्रत्येक रचनेत देखील शेखरचा समावेश करून घेतला. वाद्यवृंदात गातांना, परिचित गाण्यांचे अनुकरण करणे एकवेळ सोपे, पण एक संपूर्ण नवीन रचना गीतकाराच्या आणि संगीतकाराच्या अपेक्षेप्रमाणे सादर करणे महाकठीण! पण, सरांनी दिलेल्या सूचना, शिकविलेले रेकॉर्डिंगचे तंत्र, त्यातील बारकावे, त्यातल्या खुबी टीप कागदासारख्या आत्मसात केल्याने शेखर हे आव्हान लीलया पेलतो. आता प्राप्त झालेल्या नैपुण्याचं सगळं श्रेय तो सरांना देतो.

असेच अजून एक नाव ज्यांच्याबाद्दल वाटणारा आदर शेखरच्या शब्दाशब्दातून ओसंडून वाहतो- सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल! या नावाजलेल्या गायिकेने त्याकाळी जर या होतकरू गायकावर एवढा विश्वास दाखवला नसता तर कदाचित शेखरचं गानविश्व संकुचितच राहिलं असतं. अनुराधाताई यांच्या बरोबर केलेले दौरे, त्यांच्यामुळे अनेक नामांकित व्यक्तींशी झालेल्या ओळखी आणि या सगळ्यामुळे स्वतःच्या गायकीवर पडलेला प्रभाव शेखर खुल्या दिलाने मान्य करतो.

गायक 'मेड टु ऑर्डर' असावा लागतो हे परत एकदा पटवून दिलं ते 'हाक एक आठवण' या प्रयोगाने. जशी मागणी तसा पुरवठा! एरवी काहीसा अबोल असणारा शेखर या शो च्या वेळेस मात्र खूप खुलतो कारण या कार्यक्रमाची ती गरजच आहे! हा शो बघितल्यावर मला नेहमी एक प्रश्न पडतो, 'हाक' असे गोंडस आणि सभ्य नाव या शो ला का देण्यात आलं असावं, त्यापेक्षा डॉ. राहुल देशपांडे आणि शेखरने घातलेला 'धुडगूस' असे नाव याला जास्त समर्पक ठरले असते! यातील गमतीचा भाग सोडून द्या, पण डॉ. राहुल यांच्या अत्यंत हटके असलेल्या या रचनांना आपल्या स्वभावाविरुद्ध जाऊन शेखरने न्याय दिला आहे! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणाचीतरी भासलेली गरज आणि त्यांना मारलेली हाक असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. खरंतर गंभीर असलेला हा विषय डॉ. राहुल यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने मांडला आहे आणि रसिकांच्या चेहऱ्यावर कायम एक हास्य राहील याची पुरेपूर काळजी या दोघांनी घेतली आहे. २००७ साली टेलिफोन कंपनीच्या जिंगल्सच्या निमित्ताने झालेल्या या दोघांच्या ओळखीचे रुपांतर लवकरच मैत्रीत झाले. शेखरचा आवाज परिपूर्ण आहे हे जाणवल्याने, डॉ. राहुल यांनी आपल्या प्रत्येक प्रॉजेक्ट मधे शेखरला संधी दिली. 'हाक' मुळे रोहित नागभिडे, हेमंत पेंडसे, प्रज्ञा देशपांडे यांच्याशी जुळलेल्या ऋणानुबंधाविषयी शेखर भरभरून बोलतो. 'आळंदीचा राणा' या संत ज्ञानेश्वर यांच्यावर आधारित असलेल्या प्रॉजेक्ट मधे खरंतर शास्त्रीय गायकालाच वाव होता, पण त्यात देखील डॉ. राहुल यांनी शेखरच्या बाजाला शोभतील अशा रचना त्याच्याकडून गाऊन घेतल्या. त्या दोघांचाच अजून एक अविष्कारी द्विपात्री प्रयोग म्हणजे 'जादू सिनेगीतांची'! "यात काय वेगळं असणार आहे, परत एकदा ऑर्केस्ट्राच ना" या माझ्या प्रतिक्रियेवर शेखरने सांगितलेली कार्यक्रमाची संकल्पना अशी होती की "आपल्या दैनंदिन जीवनावर असलेला सिनेगीतांचा प्रभाव त्यातून आम्ही मांडला आहे. कधी कधी बरच भाष्य करून सुद्धा जे पटवून देता येत नाही किंवा समजावून सांगता येत नाही, तेच गाण्याची एखादी लकेर चुटकीसरशी सांगून जाते आणि आम्ही हाच विषय निवडला आहे.'

शेखर, अगदी खरं आहे. हेच बघ ना, एखाद्याबद्दल वाटणारा आदर, कृतज्ञता प्रत्येकवेळी बोलून दाखवताच येईल असे नाही. त्यांचे ऋण इतके असतात की 'thank you' म्हणणं खूप औपचारिक, कोरडं आणि तोकडं वाटतं आणि बोलून व्यक्त व्हावं तर डोळे असहकार पुकारतील, अश्रूंना वाट मोकळी करून देतील आणि शब्द खुंटतील अशी भीती वाटते. मग अशावेळी मनाशी फक्त एक खुणगाठ बांधावी 'आपल्यालाही असच सत्पात्री दान करायचं आहे.'…. मला नेमकं काय म्हणायचंय ते समजायला देखील विंदांची एकच ओळ पुरेशी आहे 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत.'

---

Source: https://nishadpune.com/journey/journey-21 · Nishad Pune
