# ' बोल साई बोल '

- **Written by:** Dr. Manasi Arkadi
- **Published:** 17 January 2013
- **Language:** Marathi (Devanagari)

(18)

किती विरोधाभास आहे ना… शब्दकोशात असंख्य शब्द असून सुद्धा 'शांतता' आपल्याला सगळ्यात प्रिय असते, दुनिया रंगरंगीली असून सुद्धा पांढरा रंगच जास्त आवडतो, अवती-भवती इतक्या प्रेक्षणीय गोष्टी असून सुद्धा स्वतःच्या मनात डोकावणं जास्त आनंद देते, अनेक हितचिंतक असून सुद्धा मनाचा कौल जास्त मोलाचा वाटतो आणि एवढा अत्याधुनिक स्टूडिओ स्थापन करून सुद्धा अनिल-शेखरला पहिला व्यावसायिक अल्बम 'हिप-हॉप' गाण्यांचा नव्हे तर 'श्रद्धा आणि सबुरीचा' संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भक्तीरचनांचा करावासा वाटतो!

'बोल साँई बोल' ही 'निषाद ऑडीओ-विज्युअल्सची पहिली निर्मिती! जगभरातील साईभक्तांना त्याचा आनंद घेता यावा या उद्धेशाने सर्व रचना 'हिंदी' मधे करण्याचे ठरले. गायक तर त्यांच्याकडे होताच आणि गायिका म्हणून अनुराधाताई पौडवाल यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झाले होते. आता प्रश्न होता गीतकार आणि संगीतकार यांचा! प्रथितयश कलाकारांना न घेता नवोदितांना संधी द्यावी याबाबत शेखर आणि अनिल दोघेही ठाम होते. शोधकार्याला सुरवात झाली खरी पण 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' या म्हणीचा लवकरच त्यांना प्रत्यय आला. एक गुणी आणि प्रतिभाशाली संगीतकार तर शेखरच्या घरातच होता! शेखरचा धाकटा भाऊ निखिल महामुनी याच्यावर संगीतरचनेची जबाबदारी सोपविण्यात आली तर गीतलेखनाच्या ध्यासापायी बिहारहून पुण्यात आलेला आणि मिठाईच्या दुकानात जिलबी तळुन उदरनिर्वाह करणाऱ्या मुकेश यादव या कवीवर गीतकाराची!

या प्रतिभासंपन्न कवीने अल्पावधीतच सगळ्या रचना लिहून काढल्या आणि निखिलने निरनिराळ्या गीतप्रकारांचा प्रयोग करत, शास्त्रीयसंगीताचा आधार घेत, शेखर आणि अनुराधाताईंच्या आवाजाच्या पट्टीचा आणि जातीचा अभ्यास करत त्यावर अप्रतिम स्वरसाज चढविला. गाण्याच्या प्रकृतीनुसार सतार, तबला, बासरी, संतूर, शहनाई, मेंडोलीन, स्वरमंडल, वायोलिन, तबलातरंग, पखवाज, ढोलक, डफ, चंडा याचा वापर करत आणि शिवरंजनी, ललत, मालकंस, यमन, भटियार, बसंत या रागांनी गाण्याचे आशयसौंदर्य खुलवित निखिलने जे काही मांडलं ते ऐकून आपल्या अल्बमला यापेक्षा योग्य संगीतकार मिळाला नसता याचं समाधान मानावं की मोठा भाऊ या नात्याने कौतुकाने आणि अभिमानाने त्याची पाठ थोपटावी हेच शेखरला कळेना! 'तुमसे क्या माँगू मेरे साँई', 'प्रेम करो ना बनो कठोर' 'तुझको निहारु चारों धाम' या रचना तर केवळ अद्भुत!

प्रत्यक्ष रेकॉर्डिंगचा अनुभव तर अत्यंत रोमांचकारी होता. अनुराधाताईंचं आगमन, ध्वनिमुद्रण आणि त्यांनी केलेली स्तुती हे सारे स्वप्नवत होते असं शेखर सांगतो. या नंतर मात्र वेध लागले प्रकाशनाचे. 'शिर्डीवाले साँईबाबा' या 'अमर, अकबर, अँथोनी' चित्रपटातील अत्यंत गाजलेल्या कव्वालीचे संगीतकार आणि साईभक्त, एल. पी जोडीतले 'प्यारेलाल' यांच्या हस्ते हे प्रकाशन व्हावे अशी शेखरची खूप इच्छा होती, पण ना जान ना पेहचान मग हे काम होणार कसे? पण ज्याच्या दरबारातून कुणीही 'मायूस' परतत नाही अशी ख्याती असलेल्या साईबाबांनी शेखरची ही चिंता सुद्धा दूर केली. कुठलेही आढेवेढे न घेता प्यारेभाईंनी होकार तर दिलाच वर सगळ्यांना घरी बोलावून आदरातिथ्य देखील केले! बालगंधर्व रंगमंदिरात अत्यंत देखण्या आणि नेटक्या समारंभात प्यारेलालजींच्या शुभहस्ते या अल्बमचे प्रकाशन झाले. मुख्य समारंभांपूर्वी शिर्डीच्या साईमंदिरात बाबांच्या चरणी ही सी.डी. ठेवण्यात आली आणि भक्तांना मोफत वाटण्यात देखील आली.

'बोल साँई बोल' च्या निर्मिती दरम्यान अनेकदा दैवीशक्तीच्या अस्तित्वाची अनुभूती या सगळ्या टीमने घेतली. गंभीरातली गंभीर समस्या देखील ध्यानीमनी नसतांना, अनोळखी माणसांकडून, अनपेक्षितरीत्या सुटत होती. शेखरच्या या बोलण्यात मला कुठलीही अतिशयोक्ती वाटली नाही कारण तुम्ही देवासाठी काय-काय करता यापेक्षा किती मनापासून करता हेच तर 'तो' बघत असतो आणि भक्त अडचणीत असतां धावून जाणे ही तर 'त्याची' खासियतच आहे आणि याबाबत शेखर आणि टीमची निष्ठा खरच कौतुकास्पद होती. कुणीही या अल्बमकडे व्यावहारिक दृष्टीकोनातून बघितलेच नाही. जणू काही ती एक प्रकारची 'ईश्वरसेवा' आहे असे समजून प्रत्येक जण आपले काम भक्तिभावाने करीत होता. 'काय मिळालं तुला या अल्बम निर्मितीमुळे' असं शेखरला विचारले असता 'अतीव समाधान आणि तृप्ती' हे त्याचे उत्तर त्याचीच तर साक्ष देते. एक गोष्ट मात्र मनोमन पटली…. देवच काय आपण सुद्धा फक्त 'भावाचेच भुकेले' आहोत!

---

Source: https://nishadpune.com/journey/journey-17 · Nishad Pune
